कोल्हापूर : शिवनाकवाडी येथे यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे ३०० हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली असून, अनेक रुग्णांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप व अशक्तपणासारखी लक्षणे जाणवू लागली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत प्रभावित रुग्णांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले. सुदैवाने, बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सर्वांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवनाकवाडी येथे आमदार राहुल आवाडे यांनी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली व रुग्णांना तातडीने व सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी प्रशासन व आरोग्य विभागाला अधिक तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले. विषबाधेच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास करण्याची मागणी करत भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही आदेश दिले. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच सर्वांना मोफत व तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्य अधिकारी, प्रशासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.