सामाजिक शास्त्र संशोधनाबाबत कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

कोल्हापूर: सामाजिक शास्त्रांतील संशोधकांनी आपले संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल (दि. ३) केले.

 

 

शिवाजी विद्यापीठातील सामाजिक शास्त्रांतर्गत “संशोधन पद्धतीशास्त्राचे सामाजिक शास्त्रांतील महत्व” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा काल झाली. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. कार्यशाळेला विद्यापीठातील संशोधकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

डॉ. देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधनासाठीच्या पद्धतींविषयी सविस्तर विश्लेषण केले. त्यानंतर पहिल्या सत्रात डॉ. कविता वड्राळे यांनी संशोधनामधील नितीमत्ता, वाङ्मयचौर्य आणि संदर्भ पद्धती यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. संतोष सुतार यांनी  सामाजिक शास्त्रांसाठी सांख्यिकीय तंत्राविषयी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात डॉ. टी. व्ही. शर्मा यांनी सामाजिक संशोधनातील टप्पे विषद केले. समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेस डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुखदेव उंदरे यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नेहा वाडेकर, डॉ. मयूरेश पाटील, आकाश ब्राम्हणे, डॉ. दादा ननवरे, डॉ. दिग्विजय पाटील आदींनी संयोजन केले.