कोल्हापूर:
भारतीय राज्यघटना मौलिक असून ती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मीडिया स्प्रेक्टम’च्या ‘संविधान अमृतमहोत्सव विशेषांका’च्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.
कुलगुरु प्रा. शिर्के म्हणाले, देशभर संविधान अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिवाजी विद्यापीठानेही अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले आहेत.
याचाच एक भाग म्हणून मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘संविधान अमृत महोत्सव विशेषांका’कडे पाहता येते. या अंकात राज्यघटनेतील विविध अंगांना स्पर्श केला असून यातून तरुणांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होईल. अंक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही संदर्भ जमवले आणि घटनेच्या मूळ प्रतीचा अभ्यास करुन मांडणी केली, ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत. माहिती देताना संतुलित स्वरुपाची माहिती त्यांनी द्यावी. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणताही विषय मुळापासून समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही कुलगुरु प्रा. शिर्के म्हणाले.
प्र-कुलगुरू प्रा. पाटील म्हणााले, राज्यघटना तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी पहायला मिळते. राज्यघटनेतील विविध कलमे मनात कोरुन ठेवावी अशी आहेत. राज्यघटनेने मानवी जीवनाच्या सर्वच अंगांचा विचार केला आहे. अगदी पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयाची नोंदही राज्यघटनेने घेतली आहे. राज्यघटनेवर सर्वांनीच चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे.
कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी येत्या काळात विद्यार्थ्यांनी नवनवे विषय हाताळून आणखी व्यापक विशेषांक प्रकाशित करावेत, असे आवाहन केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. उद्देश पाटील आणि सानिका भोरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.