बी.आर. खेडकर शिल्पकला कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८ शिल्पकारांनी  कार्यशाळेत आपल्या शिल्पाकृती तयार करून सादर केल्या. यामध्ये यश कुंभार याच्या शिल्पाकृतीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 

 

 

शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये काही हौशी, काही शिकाऊ आणि काही तयार अशा ४८ शिल्पकारांनी सहभाग घेतला. सहावीच्या विद्यार्थ्यापासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत व्यक्तींचा सहभाग हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले. काहींनी तर प्रथमच हातात माती घेऊन तिला आकार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बी.आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ यांनी सुरवातीला सहभागींना शिल्प कसे तयार करावयाचे याची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानंतर सहभागींनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार विविध शिल्पे साकारली. त्यामध्ये बी.आर. खेडकर यांना आदरांजलीपर अशीही काही शिल्पे तयार करण्यात आली. भित्तीशिल्पे, मूर्ती, लाईव्ह मूर्ती, संकल्पशिल्पे अशा अनेक प्रकारच्या शिल्पाकृती कलाकारांनी तयार केल्या.

सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये यश कुंभार याने प्रथम, दर्शन मिस्त्री याने द्वितीय आणि रोहन कुंभार याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना अनुक्रमे रु. २०००, रु. १००० आणि रु. ५०० रोख आणि प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याखेरीज, रोहित बावडेकर, अभिनंदन कुंभार आणि मन्वित कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. शिल्पकार संजीव संकपाळ, कलाकार बबन माने आणि स्वतः सीमा खेडकर-शिर्के यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सकाळच्या सत्रात बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शिल्पकार खेडकर यांचा आदर्श घेऊन नवोदित शिल्पकारांमध्ये जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. कार्यशाळेत कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, कणकवली, छत्रपती संभाजीनगर, निपाणी येथील ४८ कलाकारांनी सहभाग घेतला.

संध्याकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कार्यशाळेत सहभागी कलाकारांनी तयार केलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीची पाहणी करून त्याविषयी आणि कलाकारांविषयीही जाणून घेतले. येथून पुढे दरवर्षी अशा प्रकारची कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात यावी आणि तिचे राष्ट्रीय कार्यशाळेत रुपांतर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन तृप्ती पुरेकर यांनी केले, तर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी बबन माने, दीपक बीडकर यांच्यासह बी.आर. खेडकर यांच्या कन्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी परिश्रम घेतले.