बुलढाणा – बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बुलढाण्यात एका गावातील डॉक्टरच्या घरात दहा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. पण आता धक्कादायक सत्य समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात ही खळबळजनक घटना घडली होती. डॉ. गजानन टेकाळे यांच्या घरावर दरोडेखोरांनी १८ जानेवारीच्या रात्री दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी डॉक्टरांची पत्नी सौ माधुरी गजानन टेकाळे यांचा खून केला होता. तर पोलिसांनी दरोड्याचा तपास सुरू केला होता. पण पत्नीचा मृत्यू होऊनही डॉक्टर टेकाळे खुनाच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी असूनही डॉक्टर पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करत नव्हते. तसेच दागिने घरातच सापडल्यामुळे पोलिसांचा डॉक्टवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरला पोलीसी खाक्या दाखवताच डॉ. गजानन टेकाळे यांनी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. टेकाळे यांचे त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते. याची कल्पना त्यांच्या पत्नीला अजिबात नव्हती. परंतु या प्रेमसंबंधात पत्नी अडसर ठरत होती. त्यामुळे मेहुणीने आपल्या सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर, अशी अट घातली होती. त्यामुळे डॉक्टर टेकाळे यांनी पत्नीच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी डॉ. टेकाळे याने पत्नी माधुरी टेकाळे यांच्या एसिडीटीच्या चुर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर
मिसळली. त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली. माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे याने तोंड उशीने दाबून त्याचा जीव घेतता. त्यानंतर कपाटातलं साहित्य अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडले जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल. त्यानंतर टेकाळे याने झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्धा अवस्थेत असल्याचा देखावा केला होता. पोलिसांनी डॉक्टरसह त्याच्या मेहुणीलाही अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.दरम्यान या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.