कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्ते चौकाच्या स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी दाभोकर कॉर्नर ते शाहूपूरी पोलिस स्टेशन या मुख्य रस्त्याची पाहणी केली.
यावेळी आरोग्य निरिक्षकाला सदरचा रस्ता दैनंदिन साफ करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. यानंतर शाहु क्लॉथ मार्केटमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. येथे हजेरीची पडताळी करुन मुख्य आरोग्य निरिक्षकांना बोलावून घेतले. आरोग्य निरिक्षक आल्यानंतर भागातील सर्व मुकादमांना व्हीडीओ कॉल लावण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व मुकादमांना जागेवरील जीओ टॅगचे फोटो आरोग्य निरिक्षकांना मागवून घेण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर शाहुपूरी येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयातही अचानक भेट दिली. या ठिकाणीही असलेल्या आरोग्य निरिक्षकाला सर्व मुकादमांचे जीओ टॅगचे फोटो मागविण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रशासकांनी विभागीय कार्यालयातील प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा उप-आयुक्त व सहा.आयुक्त यांना समक्ष भागात जाऊन फिरती करुन कर्मचारी कामाच्या ठिकाणी हजर आहेत का नाहीत याची तपासणी करण्याचे आदेश दिले. जे कर्मचारी जेवणाच्या सुट्टी नंतर कामावर हजर नाहीत अशा सर्व कर्मचा-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.