कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या या कार्यक्रमाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. आयुक्त कार्यालयात सकाळी 10.30 वाजता सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची वसुली, स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेतला.
यानंतर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र, पहिला, दुस-या व तळमजल्यावरील सार्व.टॉयलेट व शौचालयाची पाहणी केली. यामध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी असलेल्या टॉयलेट व शौचालयाची आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना दिल्या. या टॉयलेटवर महिलांसाठी व पुरुषांसाठीचा वेगळे बोर्ड लावणे, महापालिकेत येणा-या नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व बैठक व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना शहर अभियंता यांना केल्या. मुख्य इमारतीमध्ये शोभेची अथवा फुलांच्या कुंडया ठेवणे, महापालिकेची इमारत ही ऐतिहासिक वास्तु आहे याची माहिती महापालिकेत येणाऱ्या नागरीकांना व्हावी यासाठी याचा इतिहास लिहिलेला बोर्ड मुख्य चौकात लावावा. नागरी सुविधा केंद्राची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची वेगळी व्यवस्था करुन पिण्याच्या पाण्याचे बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या. यानंतर प्रशासकांनी छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयाची व त्या ठिकाणी असलेल्या टॉयलेट व शौचालयाची पाहणी करुन त्या ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
आढावा बैठकीमध्ये महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाणारी माहिती उपलब्ध करून देणे. संकेतस्थळ सायबर दृष्ट्या सुरक्षित ठेवणे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांची स्वच्छता करणे, सर्व विभागांशी रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील याची काळजी घेणे. प्रलंबित कामे व तक्रारींची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करणे. कार्यालयातील व सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन स्वच्छता करणे. नागरिकांना महापालिकेतील कार्यालयांची माहिती होण्यासाठी नकाशा लावणे. नागरीकांना भेटण्याची वेळ ठरवून त्या दिवशी जागेवर संबंधीतांनी उपस्थित रहणे. नागरीकांना जास्तीजास्त ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणे. पेपरलेस कामकाज करण्यासाठी ई ऑफिसद्वारे कामकाज करणे, प्लॅस्टिक बंदीची काटेकोर पालन करणे, प्रत्येक कार्यालयात आलेल्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे करणे याचा समावेश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक घटकाचे अगोदरचे छायाचित्र व नंतरचे छायाचित्र काढून घेण्यात येत आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, आर के पाटील, रमेश कांबळे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.