मुंबई : भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे महिलांना खाद्यपदार्थ आणि गृहउपयोगी साहित्य बनवण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सौ. अरुंधती महाडिक यांनी प्रमुख उपस्थित राहून तेथील महिलांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
महिलांच्या अंगी विविध कला गुण असतात त्यांना फक्त प्रेरणा आणि पाठबळ मिळण्याची गरज असते. गेल्या अनेक वर्षांपासून भागीरथी महिला संस्था अशा होतकरू महिलांना पाठबळ देण्याचं काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यवसायाबरोबरच बचत गटाच्या मार्फत आतापर्यंत अनेक उद्योग महिलांनी सुरू केले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध योजना उपलब्ध आहेत. महिलांनी संघटित होऊन बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग सुरू करावेत. तसेच कृषी पूरक व्यवसाय करायचा असल्यास महिलांनी ड्रोन्स प्रशिक्षण घ्याव आणि ड्रोन द्वारे शेतामध्ये औषध फवारणी करण्याचा व्यवसाय सुरू करावा. यासाठी शासन महिलांना मदत करत आहे. त्याचा फायदा महिलांनी घ्यावा, असे आवाहन ही सौ. अरुंधती महाडिक यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी अश्विनी वास्कर, मरळी सरपंच कमल चौगुले, हंबीरराव चौगुले, उपसरपंच मा. वसंत पवार, कविता पाटील, वैशाली गुरव, माया पाटील, उमा पाटील, उत्तम पाटील, प्रधान पाटील, कल्पना पाटील, विकास पाटील तसेच गजानन महिला बचत गट, समृद्धी महिला बचत गट यांच्यासह गावातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.