कोल्हापूर: महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने गायकवाड वाडा, महात्मा गांधी विद्यालय मार्केट, भास्करराव जाधव वाचनालय इमारतीमधील 5 दुकानगाळे थकबाकी असल्याने आज सील करण्यात आले. यावेळी वसुली पथकामार्फत इतर थकबाकीदारांची चालू आर्थिक वर्षातील मागणीसह भाडे रु.4 लाख 75 हजार वसूल करण्यात आले.
महापालिका मालकीचे सर्व मार्केटमधील गाळेधारकांना सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे थकबाकीदारांना भरणेबाबत नोटीसव्दारे कळविण्यात आले होते. त्यानुसार काही गाळेधारकांनी सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे भरले आहे. परंतू वारंवार सूचना देऊन व लेखी कळवूनही बहुतांश गाळेधारकांनी आपले थकीत भाडे भरणे दुर्लक्षीत करत असल्याचे निदर्शनी आले आहे.
त्यामुळे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे व सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, जर्नादन भालकर, मनिष अतिग्रे, विष्णु चित्रुक, सदानंद फाळके यांनी ही सीलची कारवाई केली.
यापुढेही जे थकबाकीदार भाडेकरु पैसे भरत नसल्यास सदरची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार व चालू आर्थिक वर्षातील भाडे संबंधितांनी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत करण्यात आले आहे.