कोल्हापूर : कोल्हापूरजिल्ह्यातील रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सीन व्हॅनचे लोकार्पण शेंडा पार्क, कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये हुपरी, पु.शिरोली, गवसे, मडूर, आंबा व माण प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर कोल्हापूर उपसंचालक कार्यालय ०१ व कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालय ०१ व सिंधुदूर्ग जिल्हयाला ०१ अशा ०३ व्हॅक्सीन व्हॅन प्रधान करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा व आरोग्य सेवा देणे सोयीचे होण्यासाठी आवश्यक सुविधा वाढविण्यास नेहमीच प्राधान्य देणार आहे.
कोल्हापूर जिल्हयासाठी महाराष्ट्रतील असणा-या आरोग्य सोयी-सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देवू. अधिकारी व कर्मचारी यांची पदभरती, आरोग्य सुविधामध्ये विविध साधन सामग्री उपलब्ध करुन कोल्हापूर जनतेला आरोग्य सेवा उत्तम दर्जाच्या मिळवून देणे माझी जबाबदारी आहे. परंतु आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचीसुध्दा या सुविधांचा जनतेला कसा लाभ प्राधान्याने देता येईल यांची जबाबदारी घ्यावी असे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
आरोग्य विभागातील रुग्ण सेवेचा दर्जा वाढविणेसाठी, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुविधा देणेसाठी राज्यस्तरीय अनुदानांतुन या रुग्णवाहिका देणेत आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, प्राचार्य कुष्ठरोग केंद्र प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ.पालेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व जिल्हयातील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.