कोल्हापूर: भारतीय प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी ध्वजास सलामी दिली. यावेळी राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरूंसह सर्व मान्यवरांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ पुस्तक परीक्षण स्पर्धेत अभिषेक लाडे प्रथम
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश होते. त्यानुसार विद्यापीठाने विविध उपक्रम राबविले. याअंतर्गत पुस्तक वाचन करून त्याचे परीक्षण करण्याची स्पर्धा अधिविभागीय स्तरावर घेण्यात आली. त्यामधून विद्यापीठ स्तरावरील तीन विजेत्यांची घोषणा करण्यात येऊन आज त्यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या अभिषेक लाडे याने प्रथम, तर शुभम मोहन जाधव (ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग) आणि रोहित रामचंद्र भांगे (शिक्षणशास्त्र अधिविभाग) यांनी अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांक पटकावले. त्यांना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.