कोल्हापूर : मराठी विभागाच्यावतीने बुधवार दिनांक २९ जानेवारी, २०२५ रोजी *मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा* या अतिशय महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करीत आहोत. या परिसंवादामध्ये मराठी भाषेचा इतिहास किती वर्षांचा, तिची पूर्वपरंपरा नेमकी कोणती, ती संस्कृतच्या परंपरेतील आहे, की संस्कृत बरोबरीने विकसित झालेली भाषा आहे, देशातील भाषिक आणि सांस्कृतिक राजकारणाचे स्वरूप कसे आहे, मराठीचे जुन्यात जुने पुरावे कोणते आणि त्यांची विश्वसनीयता काय, भाषांकडे पाहण्याचा बहुव्यापक दृष्टिकोन कोणता, त्यातून आपल्या हाती कोणत्या गोष्टी लागू शकतात, तिच्या उत्पत्तीबद्दलचे नवे सिद्धांतन कसे करायचे, त्यासाठी आपल्या हाती काय आणि किती तपशील आहेत अशा गंभीर प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे आपण मराठी भाषेचे अभ्यासक, शिक्षक म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे.
या चर्चेत भारतीय संस्कृती, सभ्यता आणि भाषांचे अभ्यासक रवींद्र इंगळे-चावरेकर (बुलडाणा), भाषाभ्यासक प्रा. दिलीप चव्हाण (नांदेड) आणि जैन आणि प्राकृत साहित्याचे अभ्यासक प्रा. गोमटेश्वर पाटील (कोल्हापूर) हे आपले विचार मांडणार आहेत. यांच्या विचारप्रकटीकरणानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्याला ही चर्चा विस्तारायची आहे. त्यामुळे आपण परिसंवादामध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती आहे.
सदर परिसंवादासाठी आपल्याला कार्यरत रजेची व्यवस्था करून त्याबद्दलचे सहभाग प्रमाणपत्र देण्याबाबतची मान्यता आहे.