सांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख या गावात स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांनी केलं; त्यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शरद पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला ,ते म्हणाले मला आठवतंय की, एकदा कधीतरी बसवराज पाटील यांच्या आग्रहाने या ठिकाणी माझी एक भेट झाली होती. माझ्या या सगळ्या भेटीमध्ये दुष्काळी भाग आणि पाण्याचा प्रश्न यासंबंधी आमच्या भेटीमध्ये अतिशय आग्रहाने भूमिका या ठिकाणी कोणी मांडली असेल तर बसवराज काका यांची आठवण ही मला करावीच लागते.
कर्नाटक राज्य, शेजारचे राज्य आहे. आम्हा सगळ्यांचे साथी आहेत, अनेक लोक आम्हा लोकांचे मित्र होते. मला आठवतंय की, माझ्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1958 च्या कालखंडामध्ये रामकृष्ण हेगडे, देवराज अर्स हे आम्हा लोकांच्या मैत्रीचे धागे होते. देवराज अर्स हे शेतकऱ्यांच्या सुख दुःखाशी समजूत घालणारे एक आगळे वेगळे नेते होते. रामकृष्ण हेगडे कितीही संकटं आली त्या संकटांवर मात करून आपलं राज्य पुढे कसा नेता येईल? याचा अखंड प्रयत्न हा त्यांच्याकडून त्या कालखंडामध्ये होत होता.
त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये दोन आमचे अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांनी कार्यकर्ते उभे केले, कार्यकर्त्यांना शक्ती दिली, राजकारणात संघर्ष असेल पण माणसं जोडणं, त्या माणसाला त्याच्या गुणांची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं. त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील, राजाराम बापु पाटील यांच्या नावांचा उल्लेख हा करावाच लागेल.
सुरुवातीच्या काळामध्ये बापुंनी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्यासमवेत प्रचंड पदयात्रा काढली. तरुणांना एकत्र केलं आणि लोकांचं दुखणं मांडण्याचं काम केलं. त्याच कामामध्ये सहकाराचा आधार घेऊन वसंतदादा हे काही संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केला. म्हणून या दोन नेत्यांना राजाराम बापु या व्यक्तीमत्वाचं आणि बसवराज काका यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध हे मी स्वतः पाहिलेले आहेत.
बापुंनी लोकांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी संघर्ष केला. पण कार्यकर्त्यांना शक्ती देणे, प्रतिष्ठा वाढवणं हे अत्यंत मोलाचं काम बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. त्याच्यामध्ये ज्या कर्तुत्ववान कार्यकर्त्यांची मालिका ही जी समाजात उभी केली त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातून बसवराज काका यांची आठवण ही निश्चित करावी लागेल. म्हणून लोकांच्या सुखदुःखाची काळजी घेणं हे काम या नेतृत्वाने अखंड केलं.
मी कधीतरी या भागातून येतो, मला आणखी एक काम आठवतं. या देशातील द्राक्ष उत्पादक त्यांची एक संघटना आम्ही लोकांनी उभारली. त्या संघटनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून उत्तम शेतकरी घेतले आणि त्या उत्तम शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जत तालुका, संख भाग याचा उल्लेख हा करावा लागेल. प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याच्यावर मात करून उत्तम प्रकारची फळबागांची शेती करण्याबद्दलचे काम या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांनी केले. अशा कामांना बसवराज काका यांचं प्रोत्साहन होतं.
मला आनंद आहे की, त्यांची पुढची पिढी आणि त्यांचे सहकारी वडिलांचा हा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची सेवा केली त्याच पद्धतीने या भागातल्या काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांशी जवळीक ठेवून त्यांना प्रोत्साहन देणे हे काम सुभाषचंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. तुमची माझी जबाबदारी आहे की, आपण या नव्या पिढीला पूर्ण मदत करू, प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्यामार्फत वडिलांचं अपूर्ण राहिलेलं जे काही काम असेल त्याची पूर्तता आपण करून घेऊ, हीच खऱ्या अर्थाने बसवराज पाटील यांना श्रद्धांजली होईल. या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो.
