शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

कुंभोज  ( विनोद शिंगे)

शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांचेकडे लेखी निवेदना व्दारे केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांना देण्यात आले.
राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी बारा वर्षे व 24 वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळणेसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

 

राज्यस्तरावरून व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) यांचेमार्फत दरवर्षी या प्रशिक्षणाचा आयोजन केले जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रति शिक्षक दोन हजार रुपये इतके शुल्क घेऊन आयोजित करण्यात आले होते.
पण गेले दोन वर्षाहून अधिक काळ मागणी करून ही सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईन आयोजित करण्यात आलेले नाही. सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईन आयोजन करण्याबाबत काही आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना प्राप्त झाले होते. पण प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण आयोजित झालेली नाही.

गेले दोन वर्षानं अधिक काळ सदाचे प्रशिक्षण आयोजित न झाल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांना निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहे.
तरी सदरचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी चाचणी परीक्षा, वार्षिक परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम यांचा विचार करता निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शहराध्यक्ष संतोष पाटील, संदिप डवंग, दतात्रय मगदूम इत्यादी उपस्थित होते.