कोल्हापूर: मुलभूत विज्ञानामुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय (उमरगा, जि. धाराशिव) यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “अणूची रचना” या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे होते.
आपल्या भाषणात डॉ. जाधव यांनी क्वांटम सायन्सविषयी माहिती सांगितली. सध्याच्या अणु संरचना तयार करण्यामध्ये विविध शास्त्रज्ञांचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव अधिक चांगल्या प्रकारे अणु संरचना समजून घेऊ शकेल. त्याचा उपयोग विविध क्षेत्रात केला जाईल. अणु संरचना संशोधन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत.
प्रा. सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय शिक्षण पद्धती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांमध्ये सामर्थ्य असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्आयाचे सांगितले. क्वांटम सायन्समुळे झालेल्या प्रगतीस या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे भारतीय संशोधकांनी २०२५ हे वर्ष क्वांटम सायन्स वर्ष म्हणून साजरे करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. सोनकवडे यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. एम. आर. वाईकर यांनी आभार मानले. साक्षी काळे व साधना परीट यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, डॉ. केशव राजपुरे, डॉ. राजीव व्हटकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. ए. आर. पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.