कोल्हापूर: विचारे माळ येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचा तळ मजला बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु पहिला मजल्याचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले आहे. हे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी आप पदाधिकाऱ्यांनी एवढे दिवस बांधकाम का अपूर्ण आहे असा सवाल केला, यावर समाज मंदिरा वरून हाय टेन्शन लाईन गेली असल्याने वरचे बांधकाम होऊ शकले नसल्याचे सांगतिले. महावितरण कडे याचा पाठपुरावा करून काम त्वरीत सुरु करावी अशी मागणी संघटक विजय हेगडे यांनी केली. महावितरण कडे पाठपुरावा करून लाईन शिफ्टिंगचे काम पूर्ण करू व बांधकामास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन अभियंता बागुल यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, मयुर भोसले आदी उपस्थित होते.