कोल्हापूर : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्याच्या प्रारुपावर ठरते, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत ज्याचे प्रारूप शाश्वत विकासाशी सुसंगत असेल, तोच व्यवसायात प्रगती करेल,असे मत शिवाजी विद्यापीठ विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी व्यक्त
केले. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागात आयोजित ‘व्यवसायाती अस्थिरता आणि शाश्वततेसाठी व्यावसायिक मोडेल्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव होते. प्रा. महाजन यांनी व्यवसायात वापरली जाणारी विविध मोडेल्स व त्यांची यशस्विता यावर सोदाहरण भाष्य केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. ए. एम. गुरव यांनी व्यवसायाच्या यशस्वीते बद्दल आणि बदलत्या प्रवाहांबद्दल कल उद्योजकांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. यानंतर ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांनी व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी विषद केल्या. बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक राजीवकुमार सिंग यांनी शाश्वत विकासासाठी पतपुरवठा याबाबत विवेचन केले, परिषदेमध्ये सुमारे २० शोध निबंधाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. केदार मारुलकर यांनी प्रस्ताविक व स्वागत केले तर डॉ. अर्चना मानकर यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी केले. परिषदसाठी विविध राज्यामधून सुमारे शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.