आणूर व बानगेजवळील पूलांच्या बाजुचा भरावा काढून पिलर उभारावेत समरजितसिंह घाटगेंची मागणी

कागल: वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे व बानगे-सोनगे या गावांदरम्यान असलेल्या पूलांच्या बाजुचा भरावा काढावा.या ठिकाणी पिलर उभारावेत.अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
यावेळी पुलाच्या बाजूला असलेल्या भराव्यामुळे पस्तीस गावातील शेतकऱ्यांचे महापुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे घाटगे यांनी मंत्री भोसले यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी.
या पुलांच्या बाजूच्या भराव्यामुळे पावसाळ्यात महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात थांबते.पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवस वेदगंगा नदीच्या पात्राबाहेर पाणी राहते. नदीकाठाशेजारील क्षेत्रातील पिके या पाण्याखाली बुडाल्यामुळे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.हे पाणी थांबून राहू नये.म्हणून पुलाजवळील भरावा काढून त्या ठिकाणी पिलर उभा करणे आवश्यक आहे.जेणेकरून भराव्यामुळे साचणारे पाणी या पिलरखालून वाहून जाईल.

याबाबत संबंधितांनी पाहणी करावी.भरावा काढून त्या ठिकाणी पिलर उभा करणेबाबत अहवाल मागवून त्यावर पुढील कार्यवाही करावी. अशी आग्रही मागणी घाटगे यांनी मंत्री भोसले यांच्याकडे केली.यावेळी मळगे बुद्रुकचे उपसरपंच दिगंबर अस्वले उपस्थित होते.

पिलरच्या पुलाबाबत मंत्री भोसले सकारात्मक

बानगे-सोनगे दरम्यानच्या पुलाच्या भरावामुळे महापुराच्या होणाऱ्या नुकसानीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर झालेल्या आनूर- बस्तवडे दरम्यानच्या पुलाच्या भराव्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करून विरोध केला होता.त्यांनी पिलर उभा करण्याची मागणी केली होती.मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून पिलरऐवजी भरावा टाकला. त्यामुळे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात महापुरामुळे शेतीस फटका बसत आहे.त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पिलर उभारले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.अशी वस्तुस्थिती मंत्री भोसले यांना निदर्शनास आणून दिली.त्यामुळे भरावा काढून पिलरबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.