बारामती : आधुनिक शेतीला नवं रूप देत बारामतीत ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या वतीने कृषिक-२०२५ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. AI, ड्रोन, स्वयंचलित तंत्रज्ञान, आणि जागतिक दर्जाच्या प्रगत शेती पद्धतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल असं हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी पशूधन तसेच फळं, फुलं, भाजीपाला यांचे विक्रमी उत्पादन घेऊन जास्तीत जास्त नफा कसा घेता येईल याचं प्रात्यक्षिक पाहता आलं.
११ कोटी रुपये किंमतीचा मारवाडी जातीचा घोडा, हैदराबादचे नवाब हसन बिन त्रिफ यांचा घोडा, पिंपरी सांडसचे अमित शिंदे यांचा १५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडा, नांदेडच्या लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांची १ कोटी रुपये किमतीची रामा आणि रावण नावाची लाल कंधारी जातीची बैलं, तसेच कर्नाटकच्या बन्नुर येथील दुर्मिळ बन्नूर जातीची मेंढी यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण पशुधन याठिकाणी पाहता येणार आहे.
शेतीसाठी क्रांतिकारक ठरू शकणारं त्रिस्तरीय पशुपालन युनिट, काळा टोमॅटो, काळी मिरची, काळा कांदा यांसारखी दुर्मिळ पिकं, ४० फुटांपर्यंत वाढणारा फुले जातीचा टोमॅटो, #AI तंत्रज्ञानाच्या मदतीने एकरी १२०-१४० टन उत्पादन देणारा ऊस, जर्मनी व जपानमधील कट फ्लॉवर पिकं, रोग-प्रतिबंधक व उच्च उत्पादकता देणाऱ्या डाळिंबाची सुधारीत पद्धत, कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेला रत्नदीप हा पेरूचा वाण, एका वर्षात उत्पादन देणारं द्राक्षाचं बुलेट हे वाण, देशी भोपळ्याचे १३ प्रकार, टोमॅटोचे लुप्त होत चाललेले २९ देशी वाण, आणि अनेक देशी-विदेशी फळं व फुलांच्या नवीन जातींचं प्रदर्शन हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नवीन शेती पद्धतींबाबत माहिती देणारे हे भव्य कृषी प्रदर्शन कालपासून बारामती (माळेगाव) येथे सुरू झाले असून २० जानेवारी पर्यंत आहे, प्रत्येक शेतकऱ्याने पहावं असं हे कृषी प्रदर्शन असून सर्वांनी आवर्जून या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले.