मराठी भाषेमध्ये  रोजगाराच्या अनेक संधी : मंदार पाटील ; विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे  उदघाटन उत्साहात

कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे) मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असून मराठी साहित्य हे सर्व अंगानी समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक अभंग, ओव्या, लावण्या,विराण्या लिहिल्या आहेत. तर पंडिती साहित्यिकांनी मराठी भाषेला  सौंदर्य मिळवून दिले आहे. शाहिरी काव्याने मराठी भाषेची अस्मिता जागवली आहे. आधुनिक साहित्यिकांनी जगण्याचे भाव साहित्यातून मांडले आहेत.अशा मराठी भाषेमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून विध्यार्थ्यानी त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी  मंदार पाटील यांनी केले.

 

 

 

ते विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ‘साहित्य आणि वाचन’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या  समन्वयक डॉ .श्रुती जोशी या होत्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रुती जोशी यांनी, पु.ल.देशपांडे यांच्या  साहित्याबद्द्लचे विचार मांडताना  साहित्य हे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे बघण्याचे भान देते. शब्दाचे लालित्य ,सुंदर भावना, चांगले विचार साहित्य आपल्याला देतात. वाचनाने माणूस समृद्ध होतो. समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर वाढला असून विद्यार्थ्यांनी अशा समाजमाध्यमांपासून दूर राहून वाचनाकडे वळले पाहिजे , असे मत मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्थाप्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी करून दिला . आभार प्रा. डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचालन कु. श्रावणी पाटील आणि प्रा. रोहिणी रेळेकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. दीपक तुपे , डॉ. नम्रता ढाळे,प्रा. दत्ता जाधव विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.