कुंभोज (विनोद शिंगे)
बाचणी गावामध्ये उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लब यांच्यावतीने प्रथमच राबविण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या अभिनव उपक्रमासाठी बाचणी पंचक्रोशीतून भरघोस प्रतिसाद मिळाला.
नागरिकांनी आपल्याकडे असणारे जुने, नविन कपडे, साड्या, स्वेटर्स, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे, ब्लॅंकेट, इ. साहित्य मिळून सुमारे १२-१३ पोती साहित्य जमा केले होते.
हे जमा झालेले साहित्य कोल्हापूर शहर परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी भागातील गरजू कुटुंबांना वाटण्यात आले. लहान मुलांच्या पासून वृद्ध लोकांच्या पर्यंत सर्वच स्तरातील लोकांचे साहित्य असल्यामुळे या झोपडपट्टी मधील सर्वच कुटुंबांना याचा उपयोग झाला. कपडे मिळाल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा या उपक्रमाचे समाधान देणारा होता.
या उपक्रमासाठी उडान फौंडेशनचे अध्यक्ष भुषण लाड, उर्वी वुमन्स क्लब च्या अध्यक्षा सारिका पाटील, रेखा उगवे, संजीवनी दळवी, राजवीर पाटील, सिद्धी पाटील, यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.