कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील भाग्यश्री दत्तात्रय कोळी या लोकनियुक्त सरपंचांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांना सरपंचपदी अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला आहे.
भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. परंतु कोळी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 10 (१-अ) नुसार पट्टणकोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांना अपात्र ठरवल्याचे पत्राव्दारे घोषित केले आहे.
सदर निर्णय मान्य नसल्यास त्याविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तरतुदीनुसार आदेश पारित झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अपील दाखल करता येऊ शकते.”