कुंभोज (विनोद शिंगे)
श्री भैरवनाथ शिक्षण संस्था खोची संचलित,कै. ऍड. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल खोची च्या प्रांगणात विविध गुणदर्शन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खोची गावच्या सरपंच रोहिणी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष-ऍड. श्री.जयवंत चौगुले, सचिव-ऍड.आशिष चौगुले, उपाध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक गावातील प्रतिष्ठित मंडळी पत्रकार सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये विविध लोक नृत्य ,पारंपारिक नृत्य विविध नाटिका रिमिक्स गाणी ,मराठी व हिंदी गाण्यांचा सुसंगम अनुभवायला मिळाला, त्यापैकी एक पंचक्रोशीतील लोकांना खास आकर्षण ठरलेली नाटिका म्हणजे,”शिवरायांचा जन्म ते राज्याभिषेक”ह्या नाटकेमध्ये 45 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या नाटिकेतून शिवरायांच्या जीवनाशी निगडित अनेक प्रसंगांची अतिशय रेखीव अशी मांडणी करण्यात आली होती.
मुघलांकडून होणारा छळ, देवाला दार उघडण्यासाठी गाऱ्हाण, जिजामातांकडून बाल शिवाजींना मिळालेली अनेक शस्त्रे चालवण्याची शिकवण, मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ, भवानी मातेने शिवरायांना दिलेली तलवार, बडी बेगम-अफजलखानाने उचललेला विडा, अफजलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडेंनी लढत ठेवलेली पावनखिंड-तोफेचा समावेश, घोड्यावरून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व राजाराम महाराज तसेच सर्व मावळे यांचे आगमन, धर्म रक्षक दंड स्वीकृती अशा अनेक प्रसंगांचे अंगावर शहारे आणणारी नाटिका सादर करण्यात आली. यावेळी सर्व वातावरण शिवमय झाले होते.
या नाटिकेची अंमलबजावणी व आखणी सौ आश्लेषा पाटील मॅडम यांनी केली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा.एस. बी पोवार सर. व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संबोधी कुरणे व यादव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खोत सर यांनी केले. बाबर सर, कोकाटे सर ,लोखंडे सर, पाटील सर ,चौधरी सर ,चौगुले सर, पोवार मॅडम ,चौगुले मॅडम मुसळे मॅडम, नयना मॅडम या सर्वांचे मुलांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.