कुंभोज ( विनोद शिंगे)
मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्यावतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, आणि महाधुरळा या चॅनेलचे संपादक गुरुबाळ माळी यांना जाहीर झाला आहे. तसेच कुंभोज येथील दैनिक लोकमतचे पत्रकार शकील सुतार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. शकील सुतार हे कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात गेल्या काही वर्षापासून दैनिक लोकमतचे काम करत आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
पत्रकार माळी हे गेले 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी विविध विषयावर 12 पुस्तके लिहिली असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन केले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार या सर्व क्षेत्रात चौफेर लेखन करणारे पत्रकार म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या प्रकाशित ग्रंथांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
राजकीय विश्लेषक म्हणून परखडपणे मत व्यक्त करणाऱ्या माळी यांचे अनेक राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यांच्या वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.