कोल्हापूर: नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले, त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी डोंगळे कुटुंबियांकडून नामदार मुश्रीफ व नामदार आबिटकर यांचे औक्षण केले व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व अभिषेक डोंगळे यांनी त्यांचा व मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी यूवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक डोंगळे, पी.जी.शिंदे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील, बी.आर.पाटील, यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता, त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आबिटकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळविणे सुकर झाले. त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार मुश्रीफ व नामदार आबिटकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर जिल्ह्यातील महायुतीच्यावतीने त्यांची ताराराणी चौकातून आयोजित केलेल्या स्वागत रॅलीसाठी रवाना झाले.