झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित

कोल्हापूर- अतिक्रमण विभागाकडून चाललेल्या कारवाईवेळी झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवणेचे काम केलेने त्यांना आज प्रशासनाने महापालिकेच्या सेवेतून निलंबित केले आहे.

 

 

 

            गुरुवारी अतिक्रमण विभाग प्रमुखांनी झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील यांचेबद्दलचा अहवाल प्रशासकांना दिला होता. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्यावतीने श्री रेणुका मंदीर परिसरात शनिवारी देवीची आंबील यात्रा असलेने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्या अनुषंगाने परिसरामध्ये अनाधिकृत फलकांपासून भाविकांच्या जिवीतास थोका तसेच वाहतुकीस अडथळा होत असलेने गुरुवारी कारवाईकरीत असताना कोल्हापूर महानगरपालिकेकडील कार्यरत कायम झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील हे पंधरा ते वीस तरुण युवकांसमवेत येऊन अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांचेशी गैरवर्तन करुन अरेरावीची भाषा, शिवीगाळ, दमदाटी करु लागले.

तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख हे कोल्हापूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांना सदर घडलेल्या घटनेबाबत भ्रमणध्वनीवरुन माहिती देत असताना संबंधित कर्मचारी यांनी अंगावर धावून घेऊन त्यांच्या हातातील भ्रमणध्वनी हिसकावून घेतला व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केलेचा अहवाल सादर करण्यात आला होता.

            त्यामुळे या अहवालाच्या अनुषंगाने प्रशासनाने शिवाजी शामराव पाटील यांचे उपरोक्त गंभीर गैरवर्तनाबाबत त्यांचेवर आज तातडीने शास्ती प्रस्तावित केली. यामध्ये झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ कलम ४ (१) नुसार महानगरपालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांचेविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तरी महापालिकेची प्रतिमा मलिन करणे, बदनामी करणे असे गैरवर्तन कोणत्याही कर्मचा-याने केलेस त्याच्यावर तात्काळ प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.