कोल्हापूर : महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाची सांगता रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. या तीन दिवसाच्या खाद्य महोत्सवामध्ये शहरातील 100 स्टॉलमधून 4,81,150/- इतके उत्पन्न बचतगटांना मिळाले आहे. हा महोत्सव महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामार्फत ताराबाई पार्क जवळील सासने मैदान येथे आयोजित करण्यात आला होता.
या खाद्य महोस्तवात 100 महिला बचत गट व पथविक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले होते. तसेच खाद्य पदार्थ बरोबरच महिला बचत गटानी बनवलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपालिकांमधील नावीन्य पूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गटही यामध्ये सहभागी झाले होते.
यामध्ये मांसाहारी लोकांसाठी वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा पांढरा रस्सा, चिकन 65, नॉनव्हेज रोल, खांडोळी, रक्ती मुंडी, सोलापूरी चिकन, मटण लोणचे तसेच शुध्द शाकाहारीमध्ये थाली पीठ, झुणका भाकरी, पुरण पोळी, विविध प्रकारची बिस्किटे, आंबोळी, दावनगिरी डोसा, बडापाव, पकोडे, व्हेज रोल, पाणी पुरी, पिझ्झा, भेल, स्प्रिंग पोटॅटो, पापड, तिकट सांडगे, दाबेली व इतर पदार्थ या स्टॉलवर नागरीकांना खावयास मिळाले.
या खाद्य महोत्सवामध्ये व्हेजचे 33 स्टॉल, नॉनव्हेजचे 32 स्टॉल व विविध कला कुसरीच्या वस्तूंचे 35 असे 100 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमधे ज्याची जास्त विक्री झाली आहे अशा व्हेज, नॉनव्हेज व वस्तूमधुन तीन क्रमांक काढण्यात आले. नॉनव्हेजमध्ये प्रथम क्रमांक श्री समर्थ महिला बचतगट, आलका घोटणे, व्हेज मध्ये प्रथम क्रमांक मंथरा महिला बचतगट-रेखा कांबळे, वस्तू विक्रीमध्ये विजया लक्ष्मी महिला बचतगट- आरती चव्हाण यांनी सर्वाधिक विक्री केली. या सर्वांना महापालिकेच्यावतीने रोपटे व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा महोत्सव प्रशासक कार्तिकेयन एस, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, उपशहर अभियंता रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अधीक्षक प्रिती घाटोळे, रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर, स्वाती शहा व अंजली सौंदलगेकर, वृषाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी विजय वणकुंद्रे, मदन ठाणेकर, दिलीप कुडाळकर यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सांस्कृतीक कार्यक्रम पार पाडली. सर्व उपस्थित खव्वये, महिला बचत गट, महोत्सवासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महानगरपालिका चे कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.