मुंबई : देशातील शेतकरी किमान हमीभाव कायदा संसदेमध्ये पारित करण्यासाठी पुन्हा एकवटू लागला असून तमिळनाडू राज्यातून पुन्हा एकदा दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतक-यांनी सज्ज रहावे असे प्रतिपादन एम.एस. पी गॅरंटी मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चेन्नई येथे झालेल्या तामिळनाडू राज्यातील शेतकरी संघटनांच्या एम. एस. पी गॅरंटी सम्मेलनात केले.
एम. एस.पी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने देशाच्या संसदेत किमान हमीभावाचा कायदा पारित करण्यात यावा या मागणीसाठी देशातील लाखो शेतक-यांना घेऊन संसद मार्गावर धडक मारण्यात येणार आहे. याकरिता देशातील विविध राज्यामध्ये संबधित राज्यातील शेतकरी संघटनांना एकत्रित करून देशभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या एम. एस. पी गॅरंटी किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. तामिळनाडू राज्यात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका आणि कडधाने ,कापूस, ऊस, चहा, कॉफी आणि नारळ या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र कोणत्याच पिकास किमान हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने उत्पादन खर्चाएवढेही पैसे मिळेनात.वाढलेल्या महागाईमुळे व तोट्याच्या शेतीमुळे देशातील युवक शेतीपासून दुर जावू लागले आहेत.
तामिळनाडू राज्यातील शेतकरी अपु-या सिंचनाच्या सोयी , कृषी मालावर प्रक्रिया करणा-या पायाभूत सुविधांचा अभाव , औद्योगीक क्षेत्रात प्रगती करत असलेल्या तामिळनाडू राज्यात सुसज्ज कृषी बाजारपेठेची कमतरता असल्याने कापणी पश्चात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.यामुळे या सर्व गोष्टीवर पर्याय म्हणून केंद्र सरकारने संसदेमध्ये किमान हमीभावाचा कायदा संमत केल्यास कृषीप्रधान देशाची ओळख कायम राहणार आहे. शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलणारे खासदार नसल्याने संसदेतील शेतक-यांचा आवाज बंद झाला आहे. यावेळी सरदार व्ही. एम. सिंग , भारताचे माजी पंतप्रधान व हरितक्रांतीचे जनक लालबहाद्दूर शास्री यांचे नातू संजय नाथ सिंग , भारतीय किसान युनियनचे बलराज घाटी , देसिया थेन्निंथिया नाथिगल इनाइप्पू विवसायगल संगमचे अध्यक्ष पी अय्याकन्नू ,
गुरूसमय्या धरमार , मध्यप्रदेश किसान युनियनचे केदार सिरोही यांचेसह तामिळनाडू राज्यातील शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी या सम्मेलनांस ऊपस्थित होते.