कोल्हापूर: कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ही सर्वसामान्य कोल्हापूर वासीयांची यात्रा आहे. भक्तीभावाने तीन दिवस पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी २००८ पासून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबीर आणि सकाळच्या सत्रात मोफत अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदाही भाविकांसाठी ही सेवा अखंडित सुरु ठेवण्यात आली आहे. यंदाची यात्रा दि.१२ डिसेंबर पासून सुरु होत असून सलग तीन दिवस भाविकांना या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून २००९ पासून श्री रेणुका देवीच्या भाविकांचे एस.टी.भाडे दरवाढ आणि खोळंबा आकार या माध्यमातून कोट्यावधी रुपये वाचले आहेत. भाविकांना आर्थिक बोजातून दिलासा देतानाच सौंदत्ती डोंगर येथे अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने २००८ पासूनच सौंदत्ती डोंगर येथे तीन दिवस भाविकांना मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात येतो.
याचा लाभ दरवर्षी हजारो भाविकांना झाला असून, या सुविधांमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होते. आमदार क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने ही जनसेवा अशीच अखंडीत सुरु करण्यात येत असून, दि.१२, १३ व १४ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर व अल्पोपहार उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तरी भाविकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहनही फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी केले.