कोल्हापूर: यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळ (वय17,रा.गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी इचलकरंजी येथे केईएम हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये या युवकाचा दुर्दैव मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भाग्येश हा इचलकरंजी येथील एका महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयास गेला होता. मधल्या सुट्टीत तो मित्रांच्या सोबत चहा व नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला, याचवेळी महाविद्यालयातील शिक्षक येत असल्याची पाहून भाग्यश व त्याच्या मित्राची धावपळ सुरू झाली. यामध्ये त्याचा पाय गटारीत अडकल्याने तो जोरात पडला .
त्याला खासगी रुग्णालयात ताबडतोब नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात त्याचा मृत्यूदेह पाठवण्यात आला. यावेळी नातेवाईक व मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती. त्याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.