कोल्हापूर : मागील वर्षभरामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव व अन्य नैसर्गिक संकटामुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर, बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली मागणी यामुळे गाय दुधाचा व्यवसायच अडचणीत सापडला आहे. यातून दिलासा मिळावा म्हणून शासनाकडून गाय दुधाला अनुदान दिले गेले होते.यासाठी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
जून 2024 पर्यंतचे अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यानंतर अनुदानात 7 रुपायापर्यंत वाढ करण्याचा निर्णयही झाला पण नंतरच्या अनुदानाची रक्कम अजूनही बहुतांश दूध उत्पादकांना प्राप्त झालेली नाही. त्यातच मध्यंतरीच्या काळात गाय दूध खरेदीची किमान आधारभूत दर शासनाकडून कमी करण्यात आला. त्यानुसार दूध संघानी गाय दुधाच्या प्रतिलिटर खरेदी दरातही घट केल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी मोठे संकट उभे राहिले आहे.
एकीकडे पशुखाद्य व अन्य वैद्यकीय सेवा यांमुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. आणि दुसरीकडे खरेदी दर कमी आणि अनुदानाची रक्कमही जमा नाही यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये शेतीसोबत प्रमुख जोडधंदा म्हणून दूध उत्पादन क्षेत्राकडे पाहिले जाते. सातत्याने येणारा महापूर आणि अवकाळीमुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना आता या प्रमुख जोडधंद्यातसुद्धा नुकसानीला सामोरं जावं लागत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.
गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर काही निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम उर्वरित अनुदानाची रक्कम त्वरित दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, तसेच आणखी काही काळासाठी अनुदान पूर्ववत सुरु ठेऊन व्यवसायाला उभारी द्यावी. शक्य असल्यास अनुदानाच्या रकमेत वाढ करावी. आणि गाय दुधाचा किमान खरेदी दर 28 रुपये प्रतिलिटर वरून 31 रुपये प्रतिलिटर करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, असे या निवेदनात म्हंटल आहे.