स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे खोतवाडीच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर: खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (23, रा. शिंदे मळा) या युवकाने स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

 

 

शुभम हा यड्राव येथील एका मोटरसायकल कंपनीत काम करत होता. तसेच तो विविध स्पर्धा परीक्षा ही देत होता. त्यांने ज्यांना सहकार्य व मार्गदर्शन केले, ते मित्र विविध ठिकाणी नोकरीला लागले. मात्र शुभमला स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्यामुळे तो नैराश्येत होता.

रविवारी त्याला सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. सकाळी आईने व त्यांने घरातील पाणी भरले. त्यानंतर शुभम अभ्यास करीत बसला तर आई झाडे लावण्यासाठी बाहेर गेली. या दरम्यान शुभमने हॉलमधील छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दार उघडत नसल्याने खिडकीतून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सर्वांना मदत करणारा मितभाषी असलेल्या शुभमच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.शुभमच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.