तळसंदे येथील डी.वाय.पाटील कृषी विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिल्या सेंटर फॉर फ्युचर स्किल्सचे उद्घाटन

तळसंदे:तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात महाराष्ट्रतील पहिल्या ‘एन.एस.डी.सी. सेंटर फॉर फ्युचर स्किल्स’चे उद्घाटन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन कपूर व डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ. पुजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एन.एस.डी.सी.) आणि एथ्नोटेक अकॅडमी यांच्या सहकार्यातून सुरु झालेल्या या सेंटरमधून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्किल कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

 

जागतिक पातळीवर नामांकित संस्थांच्या सहकार्याने तळसंदे येथे सुरु झालेले हे सेंटर फॉर फ्युचर स्किल्स विद्यार्थ्यांच्या करिअरला नवा आयाम देईल. नवनवीन तंत्रज्ञान स्विकारा, सुरवात करा आणि सातत्य ठेवा तरच आपला देश महासत्ता होऊ शकेल असे आवाहन एन.एस.डी.सी उपाध्यक्ष नितीन कपूर यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपिठावर डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार सौ पुजा ऋतुराज पाटील, एप्पल एज्युकेशनचे कंट्री हेड हितेश शहा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, आय.एस. टी. ईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, एथनोटेकचे अध्यक्ष डॉ. किरण राजन्ना, एन.एस.डी.सी चे महाव्यवस्थापक वरूण बात्रा, केंब्रिजचे दक्षिण आशिया संचालक टी के अरुणाचलम, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.एस. टी. ईचे सचिव के . एस. कुंभार, आय.एस. टी. ईचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर डॉ. महादेव नरके उपस्थित होते.

कुलसचिव डाॅ. जे. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. एथनाॅटिकचे अध्यक्ष किरण राजन्ना म्हणाले, दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या कौशल्य विकासाच्या योजना आता तळसंदेसारख्या ग्रामीण भागात डी. वाय. पाटील विद्यापिठात उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी जगभरात नामांकित असलेल्या सात कंपन्याच्यावतीने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात येणार आहे.

डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पुजा पाटील म्हणाल्या, जागतिक शर्यतीत उतरताना येथील विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि त्याचे प्रशिक्षण देण्याची सुविधा या केंद्रात मिळेल. मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयबीएम, ॲपल, इंटेल, टाटा ग्रुप, आयआयटी आणि आयआयएम यासारख्या अग्रगण्य संस्थांचा यासाठी सहयोग लाभला असून कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,ब्लॉक चेन,सॉफ्ट स्किल, इंटरप्रेनेर्शिप स्किल, हेल्थकेअर अँड मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स, टेक्निकल स्किल्स विकसित करण्यासाठी मदत होणार आहे. अतिशय माफक शुल्कात उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण भागातील घ्यावा.

कुलगुरु डाॅ. के. प्रथापन म्हणाले, जागतिक स्तरावर तंत्रज्ञानामध्ये नामांकित कंपन्या तळसंदेसारख्या ग्रामीण भागात येत आहेत ही डी.वाय. पाटील ग्रुपला अभिमानास्पद बाब आहे.

इंडियन सोसायटी फाॅर टेक्नीकल एज्युकेशनचे अध्यक्ष डाॅ. प्रतापसिंह देसाई म्हणाले, भारतात लाखो अभियंते आहेत पण ज्यांच्यात काही तर कौशल्य आहेत अशांची कमतरता आहे. अमेरीकेत ८४ टक्के, कोरीयामध्ये९६ टक्के लोकांकडे कौशल्ययुक्त शिक्षण आहे. तर भारतामध्ये २.९६ टक्के कौशल्यप्राप्त लोक आहेत. कौशल्य युक्त शिक्षण प्राप्त लोकांची संख्या वाढली तरच आपला देश २०४७ मध्ये महासत्ता होऊ शकेल.

यावेळी सेंटर फॉर फ्युचर स्किल्स् च्या सामंज्यस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. केम्ब्रीजचे दक्षिण आशियाचे अध्यक्ष डाॅ. टी. के. अरुणाचलम, ॲपलचे एज्युकेशनचे प्रमुख हितेश शहा यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

डाॅ. संग्राम पाटील यांनी आभार मानले. प्रा. शिवानी जंगम, प्रा. शुभदा यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डी वाय पाटील ग्रुप मधील विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.