आ. हसन मुश्रीफांकडून चिमगांवच्या परिवाराचे सांत्वन

कोल्हापूर: चिमगांव (ता. कागल) येथील रणजीत आंगज यांच्या दोन मुलांचा केकमधून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केकमधून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या या दोन सख्या बहिण- भावांच्या परिवाराचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांत्वन केले. डोंगराएवढ्या या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. हसन मुश्रीफ यांनी आज (शुक्रवार दि. ६)सकाळी मुंबईवरून कागलमध्ये येताच तडक चिमगांव गाठले. या कुटुंबाला हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने अर्थसहाय्यही देण्यात आले. शासकीय पातळीवरही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करू, असेही सांगितले.

 

 

मुश्रीफ सकाळी साडेदहाच्या सुमाराला चिमगांव येथे आंगज कुटुंबीयांच्या घरी पोहोचताच त्या मृत्युमुखी पडलेल्या दोन्हीही चिमुकल्यांचे वडील रणजीत आंगज यांनी हंबरडा फोडला. पोटच्या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या आकांताने फोडलेल्या त्या बापाच्या आक्रोशाने पाच मिनिटे निशब्द झाले . अन्नातून विषबाधा झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक बनलेल्या व उपचारानंतर प्रकृती स्थीरावत असलेल्या मृत कु. श्रीयांश व कु. काव्या यांच्या आईच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.

एकाचवेळी दोन्हीही चिमुकल्या मुलांच्या जाण्याने सैरभैर झालेल्या रणजीत आंगज यांनी मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडताना म्हणाले, साहेब….. माझा पाच वर्षांचा श्रीयांश आणि आठ वर्षाची मुलगी काव्या गेली ओ……! मी धीर देत मुश्रीफ म्हणाले, तुम्हा कुटुंबियांवर कोसळलेला हा दुःखाचा डोंगरच शब्दांच्या पलीकडला आहे. खचून जाऊ नका. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत.