इचलकरंजीच्या नवीन प्रकल्पासाठी मुंबईतील एमआयडीसीच्या कार्यालयात बैठक

कोल्हापूर : इचलकरंजी शहर आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथील सीईटीपी प्रकल्पाची क्षमता वाढवणे तसेच पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्प उभारण्याच्या संदर्भात मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने मुंबईतील एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसु यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पांच्या उभारणी, कार्यप्रणाली आणि देखभालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

 

पंचगंगा नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने इचलकरंजी शहर, पार्वती औद्योगिक वसाहत आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे तीन अत्याधुनिक सामूहिक सांडपाणी औद्योगिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 529 कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यामध्ये माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्यासह आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

सद्याचा 12 एमएलडी क्षमतेचा इचलकरंजीतील प्रकल्प 15 एमएलडी, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 1 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प 5 एमएलडी आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मोडगिरे, कोल्हापूर मंडळाचे अधिकारी श्री. हजारे, श्री. माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्यासह इचलकरंजीतील प्रोसेस उद्योजक गिरीराज मोहता, अजित डाके, संदीप सागावकर, संदीप मोघे, शहाजहान शिरगांवे, विलास शिसोदे, अनिल कुडचे, तुषार सुलतानपुरे, अभिजित पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.