कोल्हापूर : आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं, ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेचे आपणही काही देणं लागतो, या भावनेतून नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी अजित पाटील याने शाळेला मदत करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतआपण शिकलो त्या शाळेविषयी सर्वांनाच आपुलकी व आस्था असते. आणि याचाच प्रत्यय नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आला. शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या कोल्हापूर येथे खाजगी संस्थेत काम करत असलेल्या अजित पाटील याने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला अत्याधुनिक 32 इंची स्मार्ट अँड्रॉइड गुगल टीव्ही भेट देऊन समाजभान जपले. ज्या शाळेने मला घडवलं त्या शाळेच्या ऋणातून उतराई होणे अशक्य असून मी माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून अँड्रॉइड टीव्ही देत असून यापुढे ही शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी सोनुर्ले केंद्रप्रमुख शामराव पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील, सोनाली पाटील, अजित बंगे, तुकाराम पाटील, राहुल गुरव, प्रताप पाटील, अमोल गुरव उपस्थित होते.