कोल्हापुरात गारठा वाढला ; पारा १६ अंशावर

कोल्हापूर: राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून ,सोमवारी पार १६ अंशावर आला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवसांत महाराष्ट्रातही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .

 

सोमवारी शहरात कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली. सरासरीपेक्षा 1.5 अंशाने पारा घसरल्याने किमान तापमान 28.7 अंश इतके नोंदवले गेले. किमान तापमानातही 1.1 अंशाने घट झाली. यामुळे किमान पारा 16.7 अंशांवर स्थिरावला.

जिल्ह्यात थंडी वाढत चालली आहे. सोमवारी हवेत दिवसभर काहीसा गारठा जाणवत होता. सायंकाळनंतर त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. यामुळे सायंकाळनंतर रस्त्यांवरील वर्दळ तुलनेने कमी झाल्याचे चित्र शहरात होते. थंडीचा कडाका वाढल्याने सायंकाळनंतर शहरी भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र होते. लोक घराबाहेर पडताना, विशेषतः सायंकाळनंतर स्वेटर, कानटोपी परिधान केलेले दिसत होते. स्वेटर, जॅकेट, कानटोपी, हातमोजे अशी उबदार कपडे खरेदीसह थंडीपासून बचाव करणाऱ्या क्रीम, मलम आदींची खरेदी करण्यासाठीही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते.