कोल्हापुरात महायुतीची त्सुनामी; महाविकास आघाडी भुईसपाट 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची त्सुनामी आल्याने त्यात महाविकास आघाडी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनय कोरे हे विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. तर ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे व राजेश पाटील या विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी आमदार असलेले राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, आणि चंद्रदीप नरके हे पुन्हा आमदार झाले आहेत. अशोकराव माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहेत.

 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक यांनी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांना 17,630 मतांनी पराभवाची धूळ चारली. अमल यांना एक लाख 48 हजार 892 तर ऋतुराज यांना 1,31,262 मते मिळाली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांच्यात चुरस होती. सुरुवातीच्या फेऱ्यामध्ये लाटकर यांनी आघाडी घेतली होती मात्र नंतर क्षीरसागर यांनी 29 हजार 563 मतांनी विजय मिळवला. क्षीरसागर यांना एक लाख 11 हजार 85 मते तर लाटकर यांना 81522 मते मिळाली.

शिरोळ मतदार संघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चाळीस हजार 816 मतांनी विजयी झाले. त्यांना एक लाख 34 हजार 630 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांना 93814 व स्वाभिमानीचे उल्हास पाटील यांना 25 हजार दहा मते मिळाली.

इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीच्या मदन कारंडे यांचा 56,811 मतांनी पराभव केला. आवाडे यांना एक लाख 31 हजार 919 तर कारंडे यांना 75 हजार 108 मते मिळाली.

हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे अशोकराव माने 46 हजार 299 मतांनी विजयी झाले. त्यांना एक लाख 34 हजार 191 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजूबाबा यांना 87 हजार 942 तर स्वाभिमानचे सुजित मिणचेकर यांना 24 हजार 952 मते मिळाली.

कागल मतदार संघात हसन मुश्रीफ यांनी 11,581 मतांनी समरजीत घाटगे यांचा पराभव केला. मुश्रीफ यांना एक लाख 45 हजार 279 तर समरजीत घाटगे यांना एक लाख 33 हजार 688 मते मिळाली.

चंदगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील 24134 मतांनी विजयी झाले. त्यांना 842 54 मध्ये मिळाली. तर महायुतीचे राजेश पाटील यांना 60,120 मते मिळाली. जनसुराज्यचे मानसिंग खोराटे यांना 22,107 तर महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभूळकर यांना 47 हजार 995 मते मिळाली.

राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांचा 38 हजार 22 मतांनी पराभव केला. आबिटकर यांना एक लाख 42 हजार 688 तर के पी पाटील यांना एक लाख 4 हजार 666 मते मिळाली.

शाहूवाडीत विद्यमान आमदार विनय कोरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांचा 36 हजार 53 मतांनी पराभव केला. कोरे यांना एक लाख छत्तीस हजार 64 मते तर सत्यजित पाटील यांना एक लाख 11 मते मिळाली.

अतिशय चुरशीने झालेल्या करवीर मतदारसंघात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसच्या राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. चंद्रदीप नरके यांना एक लाख 34 हजार 528 तर राहुल पाटील यांना एक लाख 32 हजार 552 मते मिळाली. जनसुराज्यचे संताजी घोरपडे यांना 7931 मतावर समाधान मानावे लागले.

🤙 9921334545