कोल्हापूर : जिल्ह्यात आज मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत दिव्यांगांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांगांचे शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगाव केंद्र शाळा मतदान केंद्रावर दिव्यांग बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मतदान केल्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वि.म.लोहिया कर्णबधीर विद्यालय कोल्हापूर या शाळेचे मुख्याध्यापक उदय राऊत यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
सर्व मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासूच दिव्यांग बांधव मतदानासाठी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, स्वयंसहाय्यक, पिण्याचे पाणी, रॅम्प, आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध देण्यात आल्याबद्दल दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले.