कागल:सत्तेचे भरमसाठ फायदे घेऊन भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या समरजीत घाटगेना चांगलीच अद्दल घडवा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नांना आजअखेर समरजीत घाटगे यांनी एका शब्दानेही उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ आमचे ते सर्व आरोप खरे आहेत आणि समरजीत घाटगे यांनी ते मान्य केले आहेत. कागलमधील प्रभू श्री रामचंद्रांच्या मनोहरी मंदिरासह मतदारसंघात ७५० हून अधिक मंदिरे बांधली. त्या प्रभू श्री राम मंदिराबद्दल मी अप शब्द कसे वापरेन. प्रभू श्री. रामचंद्रांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या डोकीवर आहेत.
कागलमध्ये भव्य अशा शक्तिप्रदर्शनाच्या पदयात्रेनंतर झालेल्या विराट जाहीर सांगता सभेत मंत्री मुश्रीफ व खासदार माने बोलत होते.
मंत्री . मुश्रीफ म्हणाले, समरजीत घाटगे यांना मी आत्तापर्यंत सिद्धनेर्ली येथील दलित समाजाची त्यांनी जमीन काढून घेतल्याचे प्रकरण, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी काढलेला शाहू दूध संघ विकून मोडून खाल्ल्याचे प्रकरण, त्यांच्या पत्नीचे ड्रग्स प्रकरण, राजे बँकेतील नोकर भरतीच्या नावाखाली पिग्मी एजंटच्या ऑर्डर देण्याचे प्रकरण, शाहू साखर कारखान्यातून शाहू दूध संघाला ठेवीच्या नावाखाली दिलेल्या पैशांचे प्रकरण अशा अनेक मुद्द्यांबद्दल प्रश्न विचारले. या एकही प्रश्नाचे आजअखेर त्यांनी उत्तर दिलेले नाही. याचा स्पष्ट अर्थ होतो की, आमचे हे सगळे आरोप त्यांनी मान्य केलेत.
मंत्री . मुश्रीफ म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्रानी दुष्ट आणि कपटी असलेल्या रावणाचाही वध केला होता. प्रभू श्रीरामचंद्र दुष्ट, कपटी, आणि गोरगरिबांचा छळ करणाऱ्या समरजीत घाटगेना कधीच आशीर्वाद देणार नाहीत. ते आशीर्वाद फक्त आणि फक्त माझ्याच पाठीशी आहेत. ही निवडणूक जनतेने, आबालवृद्धांनी आणि विशेषता माता- भगिनींनीच हातात घेतली आहे. त्यामुळेच समरजीत घाटगे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.
गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदार संघ हेच आपले कुटुंब मानले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवायचे झाल्यास तेवढ्याच ताकतीने त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजयही साजरा केला पाहिजे. समरजित घाटगे यांना आता माणसांची किंमत कळू लागल्याने ते मते मागण्यासाठी दारोदार फिरत आहेत. जमिनी टिकवण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे.
अतुल जोशी म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात जातीयवादी प्रचाराची शस्त्रे आता बोथट झाली आहेत. विरोधकांच्या कोणत्याही भ्याड प्रचाराला जनतेने बळी पडू नये. आजोबांच्यासाठी नातवाने प्रचार करणे चुकीचे नाही. त्यावर सुद्धा विरोधकांनी अक्कल पाजळली आहे.
यावेळी प्रवीण काळबर, महेश घाटगे, विक्रम कामत, भरत पाटील, अजितराव कांबळे, अतुल जोशी, प्रा. मधुकर पाटील, ॲड. चौगुले, दत्ताजी देसाई, कु. उसेद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबगोंडा पाटील, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, सर्व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
तेच खरे संस्कृतीचे मारेकरी…
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, छ. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या काजळीमुळे कागल शहरात प्रदूषण वाढत आहे. हिम्मत असेल तर समरजित घाटगे यांनी प्रदूषण रोखून दाखवावे. वासुदेव ही ग्रामीण संस्कृती आहे. त्यांच्यावर मंत्री मुश्रीफसाहेब यांचा प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या समरजित घाटगे यांनी संस्कृती पायदळी तुडविली आहे. गणेशोत्सव, महामानवांच्या जयंतींना कधी दमडीही न देणारे आम्हाला संस्कृती शिकवत आहेत.
लोकनेता आणि सीए…
खासदार धैर्यशील माने म्हणाले, एसी मध्ये बसून सीएची डिग्री मिळवणे फार सोपे आहे. मात्र आयुष्यातील ३०-३५ वर्षे उन्हातानात खपून जनतेत मिसळून लोकनेता होने फार अवघड आहे, असा टोला समरजित घाटगे यांना लगावला.
हात-पाय कलम करू…
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, पॅकेज देऊन भाडोत्री आणलेल्या सुकुमार कांबळे याने माझे हात कलम करण्याची भाषा वापरली. समरजीत घाटगेच्या कुनाही कार्यकर्त्यात बोलण्याची हिंमत नसल्यामुळेच श्री. कांबळे यांनी अशी बेताल वक्तव्य केली. हिम्मत असेल तर ठिकाण सांगा. तुमचेच हात-पाय कलम करू, असा इशारा दिला.