कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड संधी आहे. यासाठी जिल्ह्यात पर्यटन हब उभे करून त्याद्वारे जिल्ह्याचा आणि शहराचा विकास करू, अशी ग्वाही कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिली. शुकवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथे आयोजित प्रचार फेरीत ते बोलत होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहरात जगप्रसिद्ध अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, ऐतिहासिक बिंदू चौक, नवीन राजवाडा, रंकाळा, पंचगंगा नदी, पाण्याचा खजिना, साठमारी, छत्रपती शाहू महाराज स्मारक, जन्मस्थळ, पन्हाळा गड, विशाळगड, जोतिबा डोंगर, टेंबलाई मंदिर अशी असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांचा पर्यटन पूरक विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढेलच सोबत स्थानिकांच्या व्यापार उदिम यात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढल्यास जिल्ह्यातील कृषी पर्यटनही वाढेल. कोल्हापूरचा गूळ आणि कोल्हापुरी चप्पल जगात प्रसिद्ध आहे. तसेच येथील मिसळ, तांबडा पांढरा रस्साही देश विदेशात प्रसिद्ध आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाई जगात प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन मंदिरे, गड – किल्ले, वारसास्थळे यांचा सुनियोजितपणे विकास केल्यास येथील पर्यटन वाढण्यास मदत होईल. कमीत कमी गुंतवणूक असलेले पर्यटन हे एकमेव क्षेत्र आहे. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी पर्यटन हब उभारण्याची नितांत गरज आहे. आगामी काळात मी यासाठी जोरदार प्रयत्न करेन, अशी ग्वाही क्षीरसागर यांनी यावेळी दिली. यातील पंचगंगा नदीकाठ, रंकाळा यांच्या सौंदर्यात भर घालण्यात आपणास यश आले असून, उर्वरित ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा आगामी काळात विकास करण्यात येईल.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, महाराष्ट्रावर कॉँग्रेसने तब्बल 50 वर्षे राज्य केले. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी काही केले नाही. महायुती सरकारने केवळ अडीच वर्षांत राज्यात विकासाची गंगा आणली. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. यामुळेच विरोधकांना धडकी भरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात जाणारे विरोधक आता आमची सत्ता आली तर 3 हजार रुपये देऊ, असे म्हणत आहेत. ज्यांनी 50 वर्षांत आमच्या माता भगिनींचा कधीही विचार केला नाही. अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी केले. आमच्या सरकारने लाडकी बहीण सुरू केली. गेले पाच महिन्यापासून पैसे देणेही सुरू केले. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणार्यांवर विश्वास ठेवायचा की नुसतीच आश्वासने देणार्यांवर ठेवायचा याचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे क्षीरसागर म्हणाले.
राज्य सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी 3 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील रस्ता कामांसाठी 100 कोटींची वर्क ऑर्डर निघाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला जोमाने सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी इतर उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सुरेश सुतार, उदय जगताप, संभाजी बसुगडे, धनाजी आमते, विश्वास आयरेकर, पिंटू शिराळे, किशोर घाटगे, दीपक काटकर, रामदास काटकर, अरुण पाटील घरपणकर, सतीश पाटील घरपणकर, महेश नलवडे, विराज चिखलीकर, सनी अतिग्रे, अशोक राबाडे, राहुल केर्लेकर, शिवराज घरपणकर, रोहित माने, विनायक साळोखे, कुंदन ओतारी, अरुण सावंत, धीरज पवार, रोहित पसारे, निरंजन खाडे, धनराज जाधव, संतोष घोडगीळकर, रियाज बागवान, राकेश पोवार, अनंत पाटील, सुरज धनवडे, शिवतेज सावंत, अक्षय बोडके, प्रशांत संकपाळ, जयराज ओतारी, शुभम माळवी आदी उपस्थित होते.