कोल्हापूर : राधानगरी मतदारसंघातील महापूर,दुष्काळ असे अनेक प्रश्न दहा वर्षांत सुटलेले नाहीत, मग प्रकाश आबिटकर हे कसले कार्यसम्राट आमदार ? यांना तर आम्ही काँग्रेसवाल्यांनी आमदार केले होते. मात्र या वेळी त्यांचा पराभव निश्चित असल्याचा जोरदार प्रहार काँग्रेसचे राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी केला.
ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
चौगले पुढे म्हणाले,” लोकांनी कार्यसम्राट म्हणावे असे काम या मतदासंघात झालेले नसताना विद्यमान आमदार स्वतःच स्वतःला कार्यसम्राट कसे काय म्हणवून घेतात ? त्यांना आम्ही आमदार केले ही त्या परिस्थितीतील आमची भूमिका होती;परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी व महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी के पी पाटील यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्क्याने पाठवण्याची काँग्रेस म्हणून आमची भूमिका आहे. साखर कारखानदारीत के पी पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याला महाराष्ट्रात नंबर एकचे स्थान मिळवून दिले असून त्यांचा कारभार विकासाभिमुख आहे. अशा आमदारांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाला गरज आहे.”
यावेळी माजी आमदार के पी पाटील गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी डी धुंदरे,संचालक प्रा किसन चौगले,रणजीत पाटील, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील – कौलवकर, राजेंद्र भाटळे यांची भाषणे झाली.
माजी सरपंच सुनील चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विश्वास पाटील,विनय पाटील,शरद पाटील,पी डी चौगले,तानाजी चौगले,शुभम पाटील, संग्राम देवकर,बाबुराव टिपुगडे आदींसह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमिशनशिवाय कारभार नाही
शिवसेनेतून जे चाळीस गद्दार गेलेत त्यापैकी एक राधानगरीचा असावा हे आमच्या मतदारसंघाचे दुर्दैव असून या गद्दारीनंतर अस्तित्वात आलेल्या युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत असे परखड भाष्य करून यांचा कमिशन शिवाय कारभार नसल्याची गंभीर टीका श्री चौगले यांनी करताच उपस्थितांनी के. पीं. च्या विजयाच्या घोषणा दिल्या.