इचलकरंजी (विनोद शिंगे) : इचलकरंजी परिसरातील व्यापारी, राज्यस्थानी मतदार महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. त्यामुळे राहुल आवाडे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार, राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक भव्य व्यापारी संवाद मेळावा लायन्स क्लब, दाते मळा येथे संपन्न झाला.
या मेळाव्याद्वारे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राहुल प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विकासात्मक कार्यांची आणि त्याच्या निवडणुकीसाठीच्या योजनांची महती स्पष्ट केली. या मेळाव्यात व्यापारी वर्गासोबत संवाद साधण्यात आला, ज्यात इचलकरंजी शहरातील व्यापारी, उद्योगपती आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाले होते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी व्यापारासाठी अनुकूल धोरणे, उद्योग क्षेत्राचा विकास आणि इचलकरंजीच्या आर्थिक प्रगतीसाठी महायुतीच्या सरकाराच्या योजनांचा सांगोपांग उल्लेख केला. त्यांनी व्यापारी वर्गाच्या समस्यांना महत्त्व देत, त्यांचा समाधान कसा होईल यावर प्रकाश टाकला.
मेळाव्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी देखील आपली मतदारसंघातील विकासाची दृष्टी, स्थानिकांच्या गरजांवर आधारित योजनांची रुपरेषा आणि भविष्यातील दृष्टिकोन मांडला. त्यांनी इचलकरंजीच्या व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार मांडले आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे ग्रामीण कोल्हापूर पुर्व जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, मिश्रीलाल जाजू, तानाजी पोवार, वृषभ जैन, नितीन धुत, अनिल डाळ्या, राजगोंडा पाटील, शहाजी भोसले, अरविंद शर्मा, महावीर जैन, दिलीप मुथा, दिपक राशिनकर, विनोद कांकानी, पांडुरंग धोनपुडे, पांडुरंग म्हातुकडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.