थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते: राहुल गांधी

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

 

 

 

नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते जेव्हा बोलायचे तेंव्हा तो कोट्यवधी लोकांचा आवाज असायचा. संविधानात सर्वांच्या विकासाबद्दल लिहिले आहे. संविधानामुळे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आयआयटी, आयआयएम, सार्वजनिक रुग्णालये आहेत. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा आहेत. संविधानात एक व्यक्ती एक मतदान, प्रत्येक जात, धर्म, प्रदेशाचा आदर केला आहे. पण देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत आहे, त्याविरोध आपली लढाई आहे. हे ९० टक्के लोक जेल, मनरेगा या ठिकाणी दिसतात. हा अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. जातनिहाय जनगणनेवर मी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो असा आरोप करतात. जातनिहाय जनगणनेवर काय भूमिका घ्यायची यावर आरएसएसमध्येही मंथन सुरु आहे, त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्याने कर्ज परतफेड केली नाही तर त्याला जेलमध्ये टाकले जातो आणि करोडो रुपये कर्ज घेऊन जो परदेशात पळून जातो त्याला उद्योगपती म्हणतात असा टोला राहुल गांधी लगावला, आपल्या भाषणात त्यांनी शिशुमंदिरासाठी एवढा पैसा कुठून येतो असा सवाल उपस्थित करत हा पैसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नॅशनल हायवे, अदानी व अंबानीचा पैसा आहे असे म्हटले जाते. पाच टक्के लोक देश चालवत आहेत.

नागपूरात आगमन झाल्याबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपुरात दिक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.