मुंबई : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जयश्री जाधव यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदारच दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर हे निवडणूक लढवीत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमदार जयश्री जाधव यांना महिलांसाठी काम करायचे आहे. त्यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे कोल्हापुरात शिवसेना आणखी मजबूत होईल. आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, “मला मुळातच समाजसेवा करायचे आहे. महिलांसाठी काम करायचा आहे. महिला पुढे यायला हव्यात स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत. 2022 मध्ये झालेल्या कोल्हापूर पोटनिवडणुकीत आपण काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलो. दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणखी संधी मिळायला हवी होती मात्र पक्षाने तिकीट दिले नाही. ”
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे निवडणूक लढवीत आहेत. तर महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसकडून उमेदवारी छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आले आहे. तर विद्यमान आमदार जाधव या काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या त्यांनी मुलाखती दिली होती मात्र काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील निवासस्थानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला
यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर , सत्यजीत जाधव उपस्थित होते.