पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षातील अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यात देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असून कोथरुड विधानसभेसाठी भाजपकडून चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुड भागामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, फुलांची उधळण करत चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले आहे.
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि शंकर महाराज मठामध्ये जाऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी दर्शन घेतलं. पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्ज दाखल केला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेघा कुलकर्णी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ‘आजच्या रॅलीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते, माता भगिनी आणि कोथरूडकरांनी अलोट गर्दी केली होती. आमदार म्हणून मी कोथरूडकरांची पाच वर्ष सेवा करू शकलो. माझ्यावरील प्रेमाची जणू ही पावतीच होती. ही गर्दी, हे प्रेम पाहून मीसुद्धा भारावून गेलो होतो. रॅलीला गर्दी करणाऱ्या माझ्या कोथरूडकरांचे मनापासून आभार मानतो. हे प्रेम असेच कायम राहील याची खात्री आहेच. ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच होता.’ असेही पाटील म्हणाले.