संशोधन पद्धतीविषयी विद्यापीठात कार्यशाळा

कोल्हापूरः भाषेच्या संशोधकांनी पुस्तकांतील सत्य आणि तथ्यांची पारख करत असताना वास्तवाचे भान ठेवावे. समाजातील चुकीच्या घटनांवर भाष्य करण्याचे ज्ञान अवगत करावे. यासाठी समाज जाणिवा ही टोकदार ठेवाव्यात. असे आवाहन हैद्रराबाद विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माया पंडित-नारकर यांनी केले.

 

 

पीएम-उषा योजनेंतर्गत शिवाजी विद्यापीठातील वि.स. खांडेकर भाषा भवन येथे संशोधन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी पार पडली. या कार्यशाळेत डॉ. पंडित या उद्घाटक व प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्यांनी पीपीडीद्वारे चार कविता व कथांविषयी संशोधन दृष्टी विकसित करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अध्यक्षस्थानी संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. के. के. शर्मा होते. प्रास्ताविक व स्वागत कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केली. मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी संशोधकांकडून होत असलेल्या सामान्य चुकांविषयी माहिती दिली. आभार डॉ. ए. एम. सरवदे यांनी व्यक्त केले.

दूस-या सत्रात पुणे विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई यांनी नवउदारवाद विषयी भाष्य करीत समाजातील बदलांना अधोरेखित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तिस-या सत्रात हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. सावंत यांनी संशोधकांनी वाचनातून वैचारिक प्रगल्भता वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दोडमणी यांनी केले. तिन्हीं पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश मुंज, डॉ. सुखदेव एकल व मृणाल मोहिते यांनी करून दिला. आभार प्रकाश निकम यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने व विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. एम. एस. वासवाणी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. दीपक भादले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुरेंद्र उपरे यांच्यासह मराठी, हिंदी, इंग्रजी व विदेशी भाषांचे संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.