शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय ;सदाभाऊ खोत यांनी मानले मोदी सरकारचे आभार

कोल्हापूर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या ‘एमएसपी’ मध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

 

 

केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांचे हमीभाव नुकतेच घोषित केले आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रेपसीड आणि मोहरीच्या एमएसपी मध्ये ३०० रु. तर मसूरच्या एमएसपी मध्ये २७५ रु. प्रति क्विंटल अशी घसघशीत वाढ करून शेतक-यांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे हरभरा पिकाच्या एमएसपी मध्ये 210, गहू 150, सूर्यफूल 140 आणि बार्ली पिकाच्या एमएसपी मध्ये 130 रु. प्रति क्विंटल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून या ६ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय , केंद्रातील एनडीए सरकारची शेतक-यांप्रति असलेली कटीबद्धता दर्शवते, असे यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलले.