21 ऑक्टोबर पोलीस स्मृतीदिनी हुतात्म्यांना वाहण्यात येणार श्रद्धांजली

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जन माहिती अधिकारी रविंद्र कळमकर यांनी दिली आहे.

 

 

दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत संपूर्ण भारतात 214 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कर्तव्य बजावित असताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांना या दिवशी पोलीस व तत्सम दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

दि. 20 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान बेपत्ता झाल्याने, त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 22 जवानांची एक तुकडी 21 ऑक्टोबर 1959 रोजी गेली होती. या तुकडीवर “हॉट स्प्रिंग्ज” या ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रानिशी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात शोध तुकडीतील 10 जवान मृत्युमुखी पडले, 5 जवान जखमी झाले तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रुशी निकराची लढत देताना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले तेव्हापासुन 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील पोलीस दलाच्या वतीने “पोलीस स्मृती दिन” म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतीदिना दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.