चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत वडणगेतील शिवपार्वती तलावाच्या कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न

कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत वडणगे येथील शिवपार्वती तलावासाठी मंजूर 14 कोटी 98 लाख रुपये कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला.वडणगे हे 20 हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले गाव असून आजूबाजूची अनेक गावांतून लोकांची इकडे ये-जा असते. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ तर, जोतिबा आणि पन्हाळापासून अनुक्रमे 5 व 10 किमी अंतरावर असणारे हे गाव असल्याने, इथे अशाप्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण तलाव सुशोभीकरणाचे काम होणे, याला पर्यटनाच्या दृष्टीने चांगले महत्व प्राप्त होणार आहे. कोल्हापूरचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंकाळा तलावप्रमाणे, शिवपार्वती तलाव देखील पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरेल.

 

या सुशोभीकरणाच्या कामामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एअर अँपेथेटर, साधारणतः दीड किमी लांबीचा वॉकिंग ट्रॅक, ओपन एअर जिम एरिया, लॉन्स, सार्वजनिक स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत, तलावाभोवती सांडपाणी निवारणासाठी गटर्स या आणि अशा अनेक सुविधा शिवपार्वती तलावाच्या कामातून होणार आहेत.

सदर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.